गंगापूर, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुका अंतर्गत नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर वालतुरे गुरुजी यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. संबंधित आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून पीडित कुटुंबाला न्याय मिळेल आणि समाजात अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या अमानुष घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आरोपीस तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नरसापूर येथे घडलेली घटना अत्यंत संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी आहे. निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, हीच अपेक्षा असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर वालतुरे यांनी सांगितले.












